नवीन पालवीचे संरक्षण, कीड नियंत्रण आणि झाडांमधील ओलावा टिकविण्यावर भर
सिंधुदुर्ग,दि.२८ ऑक्टोंबर
जिल्ह्यातील आंबा व काजू बागांमध्ये नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली असून, ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आंबा पिकावर तुडतुडे, करपा रोग व शेंडे पोखरणाऱ्या अळीचा, तर काजू पिकावर ढेकुण्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागांची नियमित पाहणी करून प्रादुर्भाव आढळल्यास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
आंबा पिकासाठी कृषी सल्ला
आंबा बागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नवीन पालवी आली आहे. काही बागांमध्ये पालवी फुटण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुडतुडे पालवीतील रस शोषून घेत असल्यामुळे पालवीचे नुकसान होऊ शकते. तसेच पालवीवर चिकटा पडून त्यावर काळ्या बुरशीची वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन पालवीवर तुडतुडे किंवा 23 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
आंबा पिकावरील तुडतुडे नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन 9 मिली प्रति 10 लिटर पाणी, करपा रोगाच्या नियंत्रणासाठी थायोफिनेट मिथाईल 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, तर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास टोलफेनपायरॅड 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्यात यावी.
फवारणीचे द्रावण पालवीवर व्यवस्थित पसरून चिकटून राहण्यासाठी स्टिकर व स्प्रेडरचा वापर करावा. ढगाळ वातावरणामुळे तुडतुडे वाढण्याची आणि पालवीवर चिकटा पडण्याची शक्यता असल्याने बागांची नियमित पाहणी करावी.
आंब्याची पालवी सशक्त होण्यासाठी आणि तिची वाढ चांगली होण्यासाठी 0:0:50 आणि 13:0:45 ही पाण्यात विरघळणारी खते प्रत्येकी स्वतंत्रपणे 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी.
काजू पिकासाठी कृषी सल्ला
काजूच्या वेंगुर्ला-1, वेंगुर्ला-4, वेंगुर्ला-7, वेंगुर्ला-9 आणि वेंगुर्ला-10 या प्रसारित वाणांना नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. वेंगुर्ला-10 आणि वेंगुर्ला-1 या वाणांतील काही झाडांवर मोहोरही दिसू लागला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे नवीन पालवीचे ढेकुण्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. पुढील 15 दिवसांत नवीन पालवीतून मोहोर येऊन त्याची वाढ होण्याची शक्यता आहे. काजूच्या झाडांभोवती जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडांच्या बुंध्याजवळ जैविक आच्छादन करावे.
अधिक माहितीसाठी डॉ.वैभव शिंदे सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग मोबाईल 9518943363 यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करून कीड व रोगांचा प्रादुर्भाव वेळीच ओळखावा आणि शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात.