हिंदू जनजागृती समितीचे तहसिलदार, पोलीस प्रशासन शाळांना कुडाळमध्ये निवेदन
कुडाळ,दि.१४ ऑगस्ट
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा सन्मान अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच शाळा-महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवावी, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ येथे कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, कुडाळ पोलीस प्रशासन व कुडाळ हायस्कूल यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात समितीने नमूद केले आहे की, राष्ट्रध्वज हा राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय पर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्वज फडकवले जातात. मात्र, अनेकदा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर, कचराकुंडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळून येतात. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांकडून वापरण्यात आलेले प्लास्टिकचे ध्वज कार्यक्रमानंतर अयोग्य पद्धतीने टाकले जात असल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे समितीने अधोरेखित केले आहे.
समितीने भारतीय ध्वजसंहिता (Flag Code of India, 2002) आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासंदर्भातील विविध कायद्यांचा संदर्भ देत राष्ट्रध्वजाचा अवमान हा दंडनीय अपराध असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. समितीने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या वापरावर नियंत्रण, राष्ट्रध्वज सन्मान जनजागृती मोहीम राबविणे, तसेच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानंतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक संकलित करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असून त्याअंतर्गत शाळांमध्ये व्याख्याने, प्रश्नमंजुषा, प्रबोधनपर उपक्रम आणि राष्ट्रध्वज सन्मानाबाबत जनजागृती केली जाते. निवेदन देताना गजानन परब तेर्सेबांबर्डे, सूरज चव्हाण आणि वासुदेव सडवेलकर, श्री शिवराम परब भोयाचे केरवडे, नामदेव सावंत आदी उपस्थित होते. हे निवेदन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, पोलीस प्रशासन कुडाळ तसेच कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक रंजन तेली यांना देण्यात आले.