कुडाळ तालुक्यातील महिलेला ऑनलाईन गंडा

शेअर करा

ऑनलाइन चिंच खरेदीच्या आमिषाने फसवणूक

राजस्थानमधून संशयिताला ताब्यात

कुडाळ दि.२४ जुलै
ऑनलाइन पद्धतीने चिंच खरेदी करण्याच्या व्यवहारातून कुडाळ तालुक्यातील एका महिलेला २ हजार ८५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका संशयिताला राजस्थान येथून ताब्यात घेत अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, संशयित अजय नरेंद्रसिंग यादव (रा. उत्तर प्रदेश) याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील एका महिलेने ऑनलाइन माध्यमातून चिंच विक्रीची जाहिरात पाहिली होती. चिंच खरेदी करण्यासाठी संबंधित व्यक्तीशी ऑनलाइन संपर्क साधल्यानंतर व्यवहार ठरला. त्यानुसार, सदर महिलेने चिंच खरेदीसाठी २ हजार ८५० रुपये ऑनलाइन पद्धतीने संबंधित व्यक्तीच्या खात्यावर पाठविले.
मात्र, पैसे पाठवूनही चिंच संबंधित महिलेला मिळाली नाही. बराच कालावधी उलटूनही माल न आल्याने आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित व्यक्तीकडून तिला शिवीगाळ तसेच अश्लील भाषेत बोलण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकरणी संबंधित महिलेने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर कुडाळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच राजस्थान येथे तपासासाठी रवाना झाले होते.
तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. संशयिताचे ठिकाण निश्चित झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने अजय नरेंद्रसिंग यादव याला दोन दिवसांपूर्वी राजस्थान येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणी ऑनलाइन फसवणूक तसेच संबंधित महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील ७५१ (३) ७८ (२) कलमांनुसार कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तपास मोहिमेत कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेष मोरे, सायबर सेलचे नितीन पुरळकर, पोलीस हवालदार सचिन गवस, पोलीस कॉन्स्टेबल सुबोध मळगावकर तसेच सायबर सेलच्या धनश्री परब यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
संशयित अजय नरेंद्रसिंग यादव याला अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

शेअर करा