कुडाळ येथील फ्लॅटसह व्याज देण्याचे महा-रेराचा आदेश

शेअर करा

राणे दाम्पत्याच्या लढ्याला अखेर यश; निर्धारीत वेळेत फ्लॅट न दिल्याने केली तक्रार

कुडाळ,दि. १९ ऑगस्ट

कुडाळ येथील राजेंद्र राणे व रेवती राणे यांनी फ्लॅटच्या ताब्यासाठी दाखल केलेल्या तक्रारीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महा-रेरा, मुंबई यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. महा-रेरा परिपत्रक क्र. ४९/२०२५ अन्वये आयोजित संमिश्र (हायब्रिड) सुनावणीदरम्यान झालेल्या युक्तिवादानंतर महा-रेरा सदस्य रवींद्र पद्माकरराव देशपांडे यांनी प्रतिवादी साई दुर्गा लँडमार्क्स अँड इन्फ्रा एलएलपी यांना तक्रारदारांना फ्लॅट क्रमांक A-301 व A-302 चा भोगवटा प्रमाणपत्रासह प्रत्यक्ष ताबा देण्याचे तसेच विलंबाच्या कालावधीतील व्याज अदा करण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फ्लॅटचा ताबा देण्याची ठरलेली तारीख २५ मे २०१८ होती. मात्र, निर्धारित वेळेत ताबा न मिळाल्याने त्यांनी महा-रेराकडे दाद मागितली होती. सुनावणीदरम्यान ताबा देण्यास झालेल्या विलंबाचा मुद्दा महा-रेरासमोर मांडण्यात आला. महा-रेराच्या आदेशानुसार, तक्रारदारांनी २५ मे २०१८ पर्यंत भरलेल्या एकूण रकमेतून कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क तसेच वैधानिक प्राधिकरणांना भरलेल्या इतर शुल्काच्या रकमांना वगळून उर्वरित रकमेवर २६ मे २०१८ पासून प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंतचे व्याज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे व्याज महाराष्ट्र रिअल इस्टेट नियम, २०१७ मधील नियम १८ अन्वये निर्धारित दराने देण्यात येणार आहे.

याशिवाय, प्रतिवादीला दोन्ही तक्रारदारांना देय असलेली व्याजाची रक्कम आणि उर्वरित देय रक्कम यांचा आपापसात समायोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. आदेशात स्पष्टपणे मंजूर केलेल्या बाबींव्यतिरिक्त तक्रारदारांच्या इतर मागण्या व दावे फेटाळण्यात आले आहेत.तसेच, प्रत्येक तक्रारीतील तक्रारदाराला २० हजार रुपये खर्चापोटी अदा करण्याचे निर्देशही महा-रेराने प्रतिवादीला दिले आहेत. महा-रेराच्या या आदेशामुळे फ्लॅटचा ताबा मिळण्यासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या राजेंद्र राणे व रेवती राणे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. ताब्यासोबतच विलंबाच्या कालावधीतील व्याज व तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

शेअर करा