Talere News:रेल्वे प्रवासात कासार्डेतील दाम्पत्याचे ९ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

शेअर करा

कणकवलीहून मुंबईकडे जाताना चोरट्यांचा डल्ला; चव्हाण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तळेरे,दि.०१ नोव्हेंबर

मुंबईला एका कार्यक्रमासाठी कणकवली वरुन रेल्वेने निघालेल्या कासार्डेतील पती-पत्नीच्या बॅगेतून तब्बल ९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या रेल्वे प्रवासादरम्यान नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने चव्हाण कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. यासंदर्भात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात महेश चव्हाण यांनी तक्रार दाखल केली असून याबाबत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत स्वतः महेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठ्ठा येथील रहिवासी असलेले महेश शिवाजी चव्हाण (वय ५४) हे आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी पत्नीसह २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मंगलौर एक्सप्रेसने (गाडी क्र. १२१३४) प्रवास करत होते. ते कणकवलीला स्टेशनवर ट्रेनमध्ये मुंबईला जाण्यासाठी निघाले.या ट्रेनच्या एस-०३ बोगीतील एस-०२ क्रमांकाच्या सीटवर बसले होते. रात्री प्रवास सुरू असताना त्यांची ट्रॉलीबॅग सीटखाली ठेवली होती. रत्नागिरी आणि रोहा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या काळात अज्ञात व्यक्तीने बॅगचे कुलूप तोडले आणि प्लास्टिकच्या पांढऱ्या पिशवीची चैन तोडून आतील सोन्याचे दागिने चोरल्याचा संशय आहे.

चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधून ६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. यात ४० ग्रॅम वजनाचे व काळे मणी असलेले सोन्याचे गठण (मंगळसूत्र दागिने जेव्हा विकत घेतले ती किंमत १ लाख २४ हजार रुपये), २०१८ मध्ये बनवलेले सोन्याचे गोठ (किंमत १ लाख १० हजार रुपये) आणि इतर दागिन्यांचा समावेश असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलीस कागदपत्रांमध्ये या दागिन्यांची किंमत २ लाख ३४ हजार रुपये दर्शवली असली, तरी आजच्या बाजारभावानुसार या ६ तोळ्याच्या दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे ९ लाख रुपये होते. ट्रेन पनवेल स्टेशनजवळ आल्यावर हा प्रकार लक्षात आल्याने चव्हाण कुटुंबियांना फार मोठा मानसिक धक्का बसला.

यानतंर प्रवास संपवून ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यावर पोलीस स्टेशन गाठून अधिकृत फिर्याद नोंदवली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चिमणाजी वैजनाथ केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फिर्यादी महेश चव्हाण हे एका पायाने अपंग असून ते या घटनेमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. या कुटुंबाचे नऊ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याने पोलिसांनी दागिने चोरलेल्या चोरट्यांचा लवकरात लवकर पकडून लुटलेला ऐवज हस्तगत करावा आणि न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीडित महेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने केली आहे.

शेअर करा