मालवण ,दि.२६ जुलै
असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बिळवस गावच्या श्री सातेरी देवी जलमंदिराचा जत्रोत्सव आज रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात संपत्र झाला.
जत्रेनिमित्त सातेरी जलमंदिराचा गाभारा, मंदिर व परिसरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर देवीला वस्त्रालंकारांनी सजविण्यात आले होते. सकाळी ८ वाजल्यापासून श्री देवी सातेरीची ओटी भरण्यास प्रारंभ करण्यात आला. भाविकांनी सकाळपासूनच ओटी भरण्यास व दर्शनासाठी रांगा लावत मोठी गर्दी केली. ओट्या भरण्यासाठी महिलांची तसेच माहेरवाशिणींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी दुपारी १२.३० ते १ या वेळेत देवीला महाप्रसादाचा नेवेद्य अर्पण करण्यात आला.

दोन्ही सत्रात देवालय परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दुपार नंतर भाविकांचा ओघ वाढला होता. जत्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध वस्तु, ओटी साहित्य, व मिठाईची दुकाने, खेळणी यांचे स्टॉल उभारण्यात आले होते.
भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत कक्षातून भावेश पालव यांच्या कडुन ध्वनीक्षेपका वरुन विविध सुचना देण्यात येत होत्या. भाविकाना देवीचे दर्शन कमीत कमी वेळेत व्हावे यासाठी रांग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. देवालयाच्या सभामंडपाबाहेर रांगेचे व्यवस्थापन केल्याने सभामंडपामध्ये भाविकांची गर्दी झाली नाही. ओट्या भरण्यासाठी महिलांची तसेच माहेरवाशिणींची उपस्थिती लक्षणीय होती. गैरप्रकार होऊ नये, म्हणून मालवण पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तसेच पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी कार्यरत होते.
मंदिरा कडे येणाऱ्या रस्त्यावर एकदिशा मार्ग केल्याने कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. एस.टी. महामंडळाच्या वतीने मसुरे येथून यात्रा स्पेशल गाड्या ठेवल्याने भाविकांची चांगली सोय झाली.
देवालय परीसरात प्रशस्त अशा पार्किगची व्यवस्था केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही. वाहतुक सुरळीत रहावी यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते. विज वितरण कंपनीच्या वतीने विज पुरवठा अखंड रहावा यासाठी वीज वितरण कर्मचारी तैनात होते. प्राथमिक आरोग्य केंद्र मसूरे, उपकेंद्र बिळवस तसेच आरोग्य कर्मचारी यांनी वैध्यकीय सेवा दिली.