मालवणच्या किनारपट्टीवर सोयीसुविधा व रोजगार संधी उपलब्ध करण्यावर भर – ना. नितेश राणे

शेअर करा

मालवणात ३५ किल्ला होडी व्यवसायिकांना उद्देशपत्राचे वितरण

मालवण,दि.३१ जुलै

गेल्या पाच वर्षात मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढती राहिली आहे. आता राजकोट किल्ल्यामुळे ही पर्यटक वाढत आहेत. त्यामुळे मालवणच्या किनारपट्टीवर सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून आज ३५ जणांना बंदर जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीसाठी उद्देशपत्र देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच स्थानिक स्टॉलधारकांना कायमस्वरूपी नियमित करण्यासाठी एमएमबीची नवी शॉप पॉलिसी लागू केली जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमानुसार बंदर व मत्स्यव्यवसाय विभागात लवकरच ४५० जागांची भरती प्रक्रिया राबवली जाईल, अशी ग्वाही राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण येथे दिली.

मालवण बंदर जेटी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करू इच्छिणाऱ्या नवीन पात्र ३५ व्यवसायिकांना उद्देशपत्र (Letter of Intent) वितरण करण्याचा समारंभ आज सायंकाळी भवन, मालवण येथे मत्स्यव्यावसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मालवण मधील ३५ नव्या होडी व्यवसायिकांना उद्देशपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मेरीटाइम बोर्डाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, जि. प. बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिवसेना तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, स्थानिक होडी व पर्यटन व्यावसायिक व अन्य उपस्थित होते. यावेळी कॅप्टन संदीप भुजबळ व सुधीर देवरे यांनी मेरीटाइम बोर्डाच्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, मालवण परिसरात दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक येतात. ही संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. त्या दृष्टीने किनारपट्टी जलवाहतुकीने जोडण्याचे आणि विकसित करण्याचे काम सुरू आहे. मच्छीमारांच्या हितासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या योजनेतून कर्जमाफी मिळवून देण्यासाठी आणि सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आमदार निलेश राणे जे जे विकासाचे प्रश्न मांडतील, त्यांना न्याय देण्याचे काम आपण करू. येथील काहीजण माझ्याकडे येऊन निवेदने देतात, मात्र त्यांनी ही निवेदन येथील आमदार निलेश राणे यांच्याकडे द्यावीत, ते सक्षम लोकप्रतिनिधी आहेत, आमच्या भावांमधील नाते हे फेव्हिकोलच्या जोडसारखे मजबूत आहे, असा टोला यावेळी मंत्री राणे यांनी लगावला. तसेच सिंधुरत्न योजनेअंतर्गत दैवज्ञ भवन हॉलच्या दुरुस्ती व सुधारणेचे काम हाती घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश राणे म्हणाले, किल्ला प्रवासी वाहतुकीसाठी ३५ परवानग्या मिळाल्याने स्थानिक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. मालवणच्या किनारपट्टीचे सुशोभीकरण आणि मेरिटाईम बोर्डाचा प्रभाव अधिक दिसणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या कर्जातून येथील मच्छीमारांना वगळण्यात यावे आणि त्यांना सवलतीच्या दरात डिझेल मिळावे. मत्स्यव्यवसाय खात्याला कृषीचा दर्जा नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला आहे, त्यामुळे मच्छीमारांचे उर्वरित प्रश्नही ते नक्कीच सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेअर करा