मालवणात नगरपालिकेतर्फे भव्य तिरंगा बाईक रॅली संपन्न

शेअर करा

मालवण,दि.१४ ऑगस्ट

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मालवण नगरपरिषदेतर्फे विविध देशभक्तीपर व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून याच अनुषंगाने शुक्रवारी ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत मालवण शहरात भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीचा शुभारंभ मालवण नगरपरिषद कार्यालयापासून झाला. तिरंगा ध्वजांनी सजलेल्या दुचाकींवरून सहभागी नागरिकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत हुतात्मा रेगे स्मारकापर्यंत रॅली काढली.

या रॅलीमध्ये हातात राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या रॅलीतून करण्यात आला.

शेअर करा