मालवण : पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

शेअर करा

मालवण,दि.२३ जून
राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मालवण नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी फातिमा कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना धान्य भेट देण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी हातभार लावण्यात आला.

यावेळी नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी फातिमा कॉन्व्हेंटला भेट देत संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

फातिमा कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन तांदूळ, डाळी व अन्य जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे संस्थेच्या कार्याला बळ मिळणार असल्याची भावना संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून केलेल्या या धान्यदान उपक्रमामुळे वाढदिवसाला सेवाभावी स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेवक ललित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, मयु पाटकर, राजू बिडये आदी उपस्थित होते.

शेअर करा