मालवण : आंबेरी येथे कर्ली खाडीत होडी पलटून एक जण बेपत्ता ; तिघे बचावले

शेअर करा

मालवण,दि.१७ सप्टेंबर

मालवण तालुक्यातील आंबेरी येथे कर्ली खाडीतून प्रवास करताना होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत मुंबई येथील दर्शन सकारिया हे खाडीपात्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. तर होडी चालक स्वप्नील संदीप वाक्कर यांनी प्रसंगावधान राखत होडीतील अन्य दोन प्रवासी महिला श्वेता सकारिया व प्रणल वाक्कर यांना वाचविण्यात यश मिळवले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आंबेरी येथील गिरीधर वाक्कर यांचे जावई दर्शन सकारिया (रा. मुंबई मीरारोड) हे त्यांची पत्नी श्वेता सकारिया हिच्या सोबत मुंबईहुन आंबेरी येथे आले होते. आज हे दोघेही वाकजुवा बेटावरील आपल्या माड बागायतीला भेट देण्यासाठी होडीत बसून कर्ली खाडीतून जाण्यास निघाले. यावेळी त्यांच्या समवेत होडी मध्ये आलेले होडी चालक स्वप्नील संदीप वाक्कर व त्याची बहीण प्रणल वाक्कर हे देखील होते. खाडी पात्रात होडी काही अंतरावर गेली असता अचानक होडी पलटी होऊन होडीतील चौघेही पाण्यात फेकले गेले. यावेळी होडी चालक स्वप्नील याने प्रसंगावधान राखत इतरांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात होडीतील दोन्ही महिलांना वाचविण्यात त्यास यश आले. मात्र दुर्दैवाने दर्शन सकारीया हे खाडीच्या पाण्यात बेपत्ता झाले.

या घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी खाडी किनारी धाव घेतली. होडी चालक वं दोन्ही महिलांना किनाऱ्यावर सुखरूप आणण्यात आले. तर दुर्घटनाग्रस्त होडीही किनाऱ्यावर आणण्यात आली. मात्र खाडीत बेपत्ता झालेले दर्शन सकारीया हे अद्याप सापडून आले नव्हते. त्यांच्या शोधासाठी रेस्क्यू पथकालाही पाचारण करण्यात आले होते. रेस्क्यू पथक व ग्रामस्थांकडून बेपत्ता दर्शन यांचा शोध सुरु आहे.

शेअर करा