मालवण,दि.२९जुलै
मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वाढलेले रान व गवत स्वखर्चातून कापून परिसर स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांनी राबविला असून त्यांच्या या सामाजिक जाणिवेबद्दल ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
दिवसभर दोन ग्रासकटरच्या साहाय्याने शाळेचा परिसर तसेच सभोवतालच्या परिसरातील वाढलेले रान व गवत कापून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित झाला असून विद्यार्थ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून होणारा संभाव्य धोका कमी होण्यास मदत झाली आहे.
संस्थाध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून राबविलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाचे विद्यार्थ्यांचे पालक, संस्था सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. तसेच त्यांच्या या सामाजिक जाणिवेबद्दल ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.