मालवण : ‘सनई चौघडे’ मालिकेत तारकर्लीच्या अभिनेत्री सौ. नमिता गावकर झळकणार

शेअर करा

मालवण,दि.१६ सप्टेंबर

झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे या मालिकेत सध्या कोकणातील भाग प्रसारित होत असून या मालिकेत मालवण तारकर्ली येथील सिने नाट्य अभिनेत्री सौ. नमिता गावकर या आजपासून झळकणार आहेत. मालिकेतील अभिनेत्री शरयू हिच्या कोकणातील काकीची भूमिका सौ. गावकर या साकारत असून बुधवार १६ सप्टेंबर पासून प्रसारित होणाऱ्या भागांमध्ये नमिता गावकर यांचा अभिनय पाहता येणार आहे.

झी मराठी वाहिनीने निर्मिती केलेली वं राजु सावंत यांचे दिग्दर्शन लाभलेली झी मराठी वरील सनई चौघडे या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या मालिकेतील परब परिवार कोकणात आपल्या गावी आल्याचे दाखविले आहे. कोकणातील या भागांचे चित्रीकरण मालवण तालुक्यातील असरोंडी या गावात गेले अनेक दिवस सुरु आहे. या भागांमध्ये कोकणातील जीवनमान, परंपरा, सण उत्सव, गणेशोत्सव, भजने, डबलबारी भजन आदी अनेक गोष्टी दाखविण्यात येत आहेत. १६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पर्यंत या मालिकेत कोकणचे दर्शन घडणार आहेत.

कोकणातील या विशेष भागांमध्ये तारकर्ली येथील सिने नाट्य अभिनेत्री नमिता गावकर या झळकणार असून मालिकेतील अभिनेत्री शरयू हिच्या कोकणातील काकीच्या भूमिकेत सौ. गावकर या दिसणार आहेत. या मालिकेत अनेक प्रसिद्ध कलाकार काम करत असून त्यांच्या सोबत काम करण्याचा तसेच एका मोठ्या बॅनरच्या मालिकेत कोकणातील पात्र साकारणे हा सुंदर अनुभव आहे, असे सौ. गावकर यांनी सांगितले.

अभिनेत्री सौ. नमिता गावकर यांनी यापूर्वी अनेक मराठी चित्रपट, टीव्ही मालिका तसेच मराठी वं मालवणी नाटकांमध्ये आपल्या अभिनयातून वेगळी छाप सोडली आहे. आता पुन्हा एकदा एका मोठ्या मालिकेत सौ. नमिता गावकर या झळकणार असून याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा