मालवण,दि.२९जुलै
मालवण कसाल महामार्गावरील कुपेरीच्या घाटीतील धोकादायक वळणावर चिऱ्याने भरलेला मोठा ट्रक पलटी झाल्याची दुर्घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने चालक व क्लीनर बचावले आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिकांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील हा ट्रक चिरे भरून चौकेच्या दिशेकडून कसालच्या दिशेने जात होता. कुपेरी घाटीतील मारुती मंदिर नजिक धोकादायक वळणावर भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदलेल्या साईडपट्टीच्या चरात ट्रक रुतल्याने चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. चालकाने ट्रक वर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तरीही ट्रक रस्त्याखाली कोसळून पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक व क्लीनरला गंभीर दुखापत झाली नाही. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले होते.