कुडाळमध्ये विवाहितेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

शेअर करा

कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ शहरातील गणेशनगर येथील रहिवासी तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (३६) यांनी घरातील बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचे दीर संजय विष्णू कुडाळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. मात्र, या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने कुडाळ शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तन्वी येथील गणेशनगर येथे आपले पती व दोन मुलांसह राहायच्या. काल रात्री जेवण करून त्या बेडरूमध्ये झोपायला गेल्या. त्याचे पती व दोन मुलगे दुसऱ्या खोलीत झोपले होते. आज सकाळी तन्वी या उठल्या नसल्याने त्याचे पती यांनी दरवाजा उघडला असता, तन्वी यांचा मृतदेह बेडरूममधील सीलिंग फॅनला ओढणीच्या सहायाने गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. ही घटना समजताच येथील नागरिकांनी तेथे धाव घेतली.
या घटनेची माहिती कुडाळ पोलिसाना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार सखाराम भोई व नंदकिशोर नेरकर यांनी पंचनामा केला. तन्वी यांचे भाऊ बाहेरगावी असतात. ते येथे यायला निघाले असून रात्री उशिरापर्यंत येथे पोहोचणार आहेत. त्यामुळे मृतदेहाचे विच्छेदन करून तो शवागृहात ठेवण्यात आला. तन्वी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. तन्वी यांनी आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या पश्चात पती, दोन मुलगे, दीर व अन्य परिवार आहे. टेम्पो व्यावसायिक सिद्धिविनायक कुडाळकर यांच्या त्या पत्नी तर रिक्षा व्यावसायिक संजय कुडाळकर यांच्या त्या वहिनी होत.

शेअर करा