गुरुपौर्णिमेनिमित्त विविध वृद्धाश्रमांना अन्नधान्य व वस्त्रांचे वाटप
मसुरे,दि.३१ जुलै (झुंजार पेडणेकर)
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ हडपीड (देवगड) चे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पुरस्कार प्राप्त श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू व वृद्धाश्रमांतील सदस्यांना अन्नधान्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. श्री. पेडणेकर हे गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे सेवाभावी काम करत आहेत.
आनंदाश्रय आणाव येथे नंदकुमार पेडणेकर यांनी उपस्थित संस्थाचालक, सहकारी आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना संबोधित करताना आपले मनोगत व्यक्त केले.
गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ केवळ पूजन करणे नसून, समाजात ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि विचारांनी प्रेरित होऊन आम्ही गेल्या तीन दशकांपासून ही सेवा अविरतपणे करत आहोत. ही सेवा म्हणजे स्वामींच्या चरणी अर्पण केलेले पुष्प आहे. आमच्या या कार्यात माझ्या सर्व सहकाऱ्यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमांतर्गत श्री. पेडणेकर यांच्यासोबत त्यांचे सहकारी श्री. विजय धाटावकर, प्रभाकर यशवंत राणे, अनंत जंगम, नितीन म्हापसेकर, मधुसूधन भडसाळे, देविदास डोंगरे, सचिन लोके आणि समीर शिरवाडकर यांनी उपस्थित राहून दिविजा वृद्धाश्रम (असलदे, देवगड), जीवदान विशेष शाळा (झाराप, कुडाळ),जीवन संजीवन सेवा ट्रस्ट – आनंदाश्रय (अणाव, कुडाळ), जीवन आनंद संस्था (पणदूर, कुडाळ) या चार विविध संस्थांमध्ये साहित्याचे वाटप केले.
प्रत्येक आश्रमास
कोलम तांदूळ १०४ किलो, तूरडाळ २५ किलो, गोडेतेल ४५ लीटर, टॉवेल १०,
साड्या २५ देण्यात आल्या.
मदतीचे हे साहित्य स्वीकारल्यानंतर सर्व संस्था व वृद्धाश्रमांच्या संचालकांनी तसेच उपस्थित वृद्धानी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.