मसुरे ,दि.३० जुलै
बिळवस ग्रामसेवा मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय बिळवस येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम अत्यंत उत्साही व मंगलमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.
बिळवस ग्रामसेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष तसेच शाळेचे प्रथम मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत जगन्नाथ पालव यानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य यावर भर देण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १०वीच्या परीक्षेत ८५% पेक्षा जास्त गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यास श्री. अरुण सूर्यकांत पालव (USA) यांच्यातर्फे, त्यांचे वडील श्री. सूर्यकांत जगन्नाथ पालव यांच्या सन्मानार्थ रु. २५,०००/- ही विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करण्यात आले.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्था व परिसरातील विविध क्षेत्रांतील दानशूर व्यक्तींकडून भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
दत्तक पालक योजनेअंतर्गत शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. नाईक सर, श्री. चव्हाण सर आणि संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. नंदकिशोर पालव यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या गौरव सोहळ्यास बिळवस ग्रामसेवा मंडळाचे पदाधिकारी संस्था कार्याध्यक्ष श्री. दाजी विश्राम पालव, सरचिटणीस श्री. अशोक जनार्दन पालव, खजिनदार श्री. विश्वनाथ दिगंबर पालव, माजी संस्थाध्यक्ष ॲड. नंदकिशोर धाकू पालव.
संस्था सदस्य: श्री. सुभाष जनार्दन पालव, श्री. चंद्रशेखर लवू पालव, श्री. एकनाथ बाबाजी पालव, श्री. रविंद्र जगन्नाथ पालव, शालेय समिती सदस्य श्री. संतोष घाडी, श्री. सोनू शिंदे, श्री. रविंद्र पालव, गोविंद सावंत, प्रशालेचे माजी शिक्षक, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.
या प्रसंगी ग्रामस्थ, पालकवर्ग आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. शिंदे सर यांनी केले.