मसुरे,दि. २१ जून (झुंजार पेडणेकर)
आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार करणाऱ्या ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पेंडुर येथील श्रीदेवी तिळंबा मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला.
गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ हा ग्रुप सायकलिंग, धावणे, चालणे आदी विविध व्यायाम प्रकारांद्वारे समाजात आरोग्याविषयी जनजागृती करत आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या योग दिन कार्यक्रमात योगासने, प्राणायाम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात योग व प्राणायामाचे मार्गदर्शन डॉ. सोमनाथ परब यांनी केले. योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, तणावमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगाची आवश्यकता याविषयी त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमात डॉ. सोमनाथ परब, रुपेश भोजने, सुरेश कांबळी, निलेश हडकर, गणेश पारकर, अमित सावंत, राजेश प्रभुलकर, बंडू माडये आणि रविंद्र चव्हाण उल्हास सावंत, प्रकाश सरमळकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी नुकतेच सायकलिंग क्षेत्रात पदार्पण केलेले युट्यूबर सुयोग वालावलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या नव्या प्रवासासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी नियमित योग, व्यायाम आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारून निरोगी जीवन जगण्याचा संकल्प सहभागी सदस्यांनी केला.