Sawantwadi News : इन्सुलीत फटाके अन् मशालींचा वापर करून हत्तीला हुसकावण्याचा प्रकार

शेअर करा

वन विभागाच्या कारभारावर प्राणीप्रेमींचा तीव्र संताप

​सावंतवाडी,दि.४ नोव्हेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावात ‘ओंकार’ हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून फटाके फोडले जात असून, हातात पेटत्या मशाली घेऊन हत्तीचा पाठलाग केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वन विभागाच्या या निष्काळजी आणि क्रूर पद्धतीवर प्राणीप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
​भारतीय संस्कृतीत हत्तीला श्री गणेशाचे रूप मानले जाते; मात्र असे असतानाही ‘ओंकार’ हत्तीसोबत अमानवीय कृत्य केले जात असल्याची टीका होत आहे. नंदीबैलाप्रमाणे त्याला गावोगावी फिरवून त्रास दिला जात असून, वन खात्याचे चुकीचे धोरण या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी न्यायालय आणि वनखाते अजूनही शांत का, असा सवाल उपस्थित करत पर्यावरणप्रेमींनी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित जबाबदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
​गेल्या २५ वर्षांत हत्तींनी शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान केले असले, तरीही हत्तीवर अशा प्रकारची क्रूरता करणे अयोग्य आहे. वन विभागाने हत्तीसाठी खाद्य असलेले वन निर्माण केले नाही त्यामुळे हत्ती लोकवस्ती असलेल्या बागायती शेती मध्ये येत आहेत.वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, फटाके आणि आगीच्या मशालींमुळे हत्ती प्रचंड घाबरतो आणि स्वसंरक्षणासाठी अधिक आक्रमक किंवा हिंसक बनतो. यामुळे हत्ती मानवी वस्तीवर चाल करून जाण्याची आणि ग्रामस्थांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
​यापूर्वीही हत्तीवर पेटत्या मशाली फेकल्याच्या घटना घडल्या होत्या. सर्व नियम धाब्यावर बसवून वन विभागाकडून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत, जर या चिडलेल्या हत्तीने मानवी वस्तीवर हल्ला करून कोणतीही जीवितहानी केली, तर त्याला पूर्णपणे वन विभागच जबाबदार असेल, असा इशारा प्राणीप्रेमींनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

शेअर करा