मुंबई : आडाळी एमआयडीसीतील भूखंड हस्तांतरणावरील स्थगिती उठवली; गोव्यात ऑगस्टमध्ये होणार गुंतवणूक परिषद

शेअर करा

​मुंबई,दि.०२ जुलै
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी मुंबईतील विधान भवन येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आडाळी एमआयडीसीच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
​आडाळी एमआयडीसीमध्ये ज्या उद्योजकांनी यापूर्वी भूखंड खरेदी केले होते, त्यांना भूखंडांचा ताबा देणे, करार करून बांधकाम परवानगी देणे इत्यादी बाबींना स्थगिती देण्यात आली होती. आजच्या बैठकीत सदरची स्थगिती उठविण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच, येथे नवीन भूखंड घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी आगामी दोन आठवड्यांत ऑनलाईन भूखंड वाटप प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. याशिवाय, आडाळी एमआयडीसी परिसरातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
​एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे व गुंतवणूक वाढावी आणि उद्योजक आकर्षित व्हावेत, यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये गोव्यात विशेष गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. सध्या एमआयडीसीचे मुख्य कार्यालय रत्नागिरी येथे असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना वारंवार रत्नागिरी येथे जावे लागत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी आता दर गुरुवारी एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी आडाळी येथेच कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध असणार आहेत.


​बैठकीत पायाभूत सुविधांचा आढावा घेताना, आडाळी एमआयडीसीमधील विद्युत उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असले, तरी इन्सुली ते आडाळी या पर्यायी ३३ केव्ही वीज वाहिनीचे काम संथ गतीने चालू असल्याबाबत चर्चा झाली. हे काम लवकरात लवकर जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच, आडाळी परिसराला लागून असलेल्या तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर करून डेटा सेंटर किंवा तत्सम मोठे उद्योग उभारण्याबाबत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
​या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन), उद्योग विभागाचे सहसचिव, महाव्यवस्थापक (भूमी), प्रादेशिक अधिकारी व इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आपल्या आग्रही मागणीनुसार उद्योगमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा