पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल; पद्मसिंह पाटीलसह ९ आरोपी निर्दोष

शेअर करा

२० वर्षांनंतर विशेष CBI न्यायालयाचा निर्णय; सबळ पुराव्याअभावी मुक्तता, माफीच्या साक्षीदाराच्या जबाबावर अविश्वास

तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला असून विशेष CBI न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ आणि ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. तसेच या प्रकरणातील माफीचा साक्षीदार पारसमल जैन याचा जबाब विश्वासार्ह नसल्याचे नमूद करत केवळ त्याच्या साक्षीच्या आधारे आरोपींना दोषी ठरवता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून धाराशिवकडे जात असताना कळंबोली येथे त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पद्मसिंह पाटील, उद्योगपती सतीश मंदादे, निवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मोहन शुक्ला यांच्यासह इतर आरोपींवर कट रचल्याचा आरोप होता.

न्यायालयात या खटल्यादरम्यान एकूण १२७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे आरोप सिद्ध करण्यात यंत्रणेला यश आले नाही. त्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. या बहुचर्चित निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

शेअर करा