सावंतवाडीचा लोककल्याणाचा वारसा पुढे नेण्यासाठी संजू परब सक्षम : आ. दीपक केसरकर

शेअर करा

वाढदिवसानिमित्त संजू परब यांना दिल्या शुभेच्छा … सदैव कार्यरत राहण्याचा दिला मंत्र

​सावंतवाडी,दि. १९ ऑगस्ट

विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे केले आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी मतदारसंघाला फार मोठा इतिहास आहे. संस्थांचे राजे माजी आमदार शिवरामराजे भोसले आणि माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांनी घालून दिलेल्या लोककल्याणाचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब सक्षम असून, आगामी काळात त्यांना राजकीय पटलावर निश्चितच मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या व्यापक लोकहितासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांनी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.


​शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात आ. केसरकर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव सुचवल्यामुळे आपल्याला थेट मंत्रीपद नाकारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट करत स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. अशा प्रकारच्या धमक्यांना आपण भूतकाळातही जुमानले नाही आणि भविष्यातही त्याची तमा बाळगणार नाही, असे सांगत त्यांनी सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार पुनरुच्चारित केला.


​मतदारसंघातील जनतेने सलग चार वेळा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिली असून, जनतेचा हा विश्वास सार्थ ठरवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्ता किंवा मंत्रीपद हुकले तरी मुंबईत राहून पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि जनतेची कामे प्रामाणिकपणे करत राहिलो, कारण पदाला चिकटून राहण्याची वृत्ती आपली कधीच नव्हती. आमदारकी किंवा मंत्रीपद मिळणे हा नशिबाचा भाग असला तरी लोकप्रतिनिधीने प्रामाणिकपणे काम केले तर जनताच त्याला भक्कम पाठबळ देते, असा कानमंत्र ही त्यांनी संजू परब यांना दिला.


​संजू परब यांच्या संघटनात्मक कौशल्याचा आणि पक्षनिष्ठेचा गौरव करताना केसरकर यांनी, आपण सहजासहजी कोणालाही राजकीय वारसदार मानत नाही, मात्र परब यांची सर्व जबाबदारी आता आपण स्वतः स्वीकारली असल्याचे सूचक विधान करून आगामी राजकीय समीकरणांचे संकेत दिले.

शेअर करा