सावंतवाडी,दि.०१ जुलै
कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ‘कृषिरत्न समूहा’तर्फे कुडाळ तालुक्यातील गोठोस येथे वृक्षारोपण, वृक्षवाटप आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. गोठोस येथील जिल्हा परिषद शाळेत या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषीदूतांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे महत्त्व, हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश आणि शेती व पर्यावरण संवर्धनात वृक्षांची असलेली गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागातून शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत गोठोस ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि गावातील प्रमुख ठिकाणी एकूण १० फळझाडे व १० शोभेच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, चिकू, काजू, नारळ या फळझाडांसह सोनचाफा व गुलाब या शोभेच्या वनस्पतींचा समावेश होता. तसेच गावातील शेतकऱ्यांना विविध फळझाडांचे व शोभेच्या वृक्षांचे वाटपही करण्यात आले. केवळ वृक्षारोपण न करता या झाडांचे योग्य संवर्धन करण्याचे आवाहनही या प्रसंगी कृषीदूतांनी ग्रामस्थांना केले.
हा उपक्रम कृषी महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एल. कुणकेरकर आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. या कार्यक्रमाला गोठोस ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली आहे.