सावंतवाडी : मळेवाड पंचक्रोशी नाभिक समाज बांधवांचा वार्षिक मेळावा उत्साहात

शेअर करा

सावंतवाडी,दि.०४ सप्टेंबर

मळेवाड पंचक्रोशी नाभिक समाज बांधवांचा तिसरा वार्षिक सहविचार मेळावा पतित पावन भक्ती मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर मळेवाड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात श्री गजानन महाराज मंदिरात श्रीफळ ठेवून तसेच श्री संतसेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.


यावेळी नाभिक समाजाच्या एकजुटीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. समाजाची एकजूट अशीच कायम ठेवून भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.


कार्यक्रमात नाभिक समाज ,उपजिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग सुनील न्हावेलकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना “निःस्वार्थ नाभिक पुरस्कार” , सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी त्यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, आता विभागस्तरावरही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मळेवाड पंचक्रोशी नाभिक समाजाच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. समाज बांधवांचे व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तसेच सर्व समाज बांधव एकत्रित येण्यासाठी वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात संघटना मजबुतीकरणासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यंदाच्या मेळाव्याचे हे तिसरे वर्ष होते.
मेळाव्यात समाज बांधवांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित समाज बांधवांना भेटवस्तूंचे तसेच सलून साहित्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी नाभिक समाज संघटना सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष सुनील न्हावेलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद पवार, सल्लागार हनुमंत कारिवडेकर, चेतन तोरसकर, दयानंद वेंगुर्लेकर, मळेवाड पंचक्रोशी नाभिक समाज संघटना अध्यक्ष अजय न्हावी, उपाध्यक्ष नवनाथ तिरोडकर, सचिव आनंद न्हावेलकर, खजिनदार संदेश आरोसकर, सुरेश पाटील,नंदकिशोर चव्हाण, शांताराम वेतोरेकर, उत्तम न्हावेलकर, ज्येष्ठ पत्रकार गणेश चव्हाण, मदन मुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


तसेच सखाराम चव्हाण, आनंद न्हावी, सिद्धेश न्हावी, पुरुषोत्तम न्हावी, अमित न्हावी , वसंत चव्हाण,यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ तिरोडकर यांनी केले, तर आभार सुनील न्हावेलकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सुरेश पाटील तसेच मळेवाड पंचक्रोशीतील सर्व नाभिक समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

शेअर करा