सावंतवाडीत ४ ऑक्टोबरला ‘वार्षिक ज्येष्ठ नागरिक मेळावा’; विविध पुरस्कारांचे होणार वितरण

शेअर करा

सावंतवाडी,दि.३० सप्टेंबर
सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’चे औचित्य साधून रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘वार्षिक ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
​या मेळाव्याला माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा संवर्धन मंत्री, आमदार दीपक केसरकर आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित राहणार आहेत. तसेच कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. ॲड. अरुण पणदूरकर हे या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
​या कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्याने ज्येष्ठांसाठी व गरजू लोकांसाठी कार्य करणाऱ्या दोन सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘श्रावणबाळ’ पुरस्काराने, तर आपल्या कार्याने समाजाला प्रेरणादायी ठरलेल्या दोन व्यक्तींचा ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात येणार आहे.
​याशिवाय, दरवर्षीप्रमाणे वयाची ७५ वर्षे, ८० वर्षे, ९० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा आणि वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या सभासद दांपत्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याला तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. दिगंबर पावसकर यांनी केले आहे.

शेअर करा