सावंतवाडी : गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी नोंदणीचे आवाहन

शेअर करा

दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार; गरजू विद्यार्थ्यांनाही आर्थिक मदत

सावंतवाडी,दि.२५ मे

दरवर्षीप्रमाणे यंदाही सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि गुणपत्रिकेची प्रत ८४८४८२७९९३ किंवा ७९७२६४८७८१ या क्रमांकांवर पाठवून नोंदणी करावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

सकल मराठा समाजाकडून गेल्या पाच वर्षांपासून दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. याशिवाय शिक्षणाची जिद्द असलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचाही हात दिला जातो. यंदाही अशाच स्वरूपात १० गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. सत्कार समारंभाची तारीख नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शेअर करा