​माडखोल येथे काजू-आंबा नुकसानीचे बोगस पंचनामे; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा​ भगवान राणे यांचा आरोप

शेअर करा

३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

​सावंतवाडी,दि.२४ जुलै
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल (डुंगेवाडी) येथे २५ डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे काजू व आंबा बागायतींचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करताना स्थानिक महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस पंचनामे केले असून, शासनाचा भरपाई निधी हडप करण्याचा प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप तालुका दिव्यांग सेनेचे उपाध्यक्ष भगवान राणे ( रा. माडखोल-डुंगेवाडी) यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी न झाल्यास ३ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
​याबाबत भगवान राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, माडखोल गावात त्यांच्या व त्यांच्या कुटुंभाच्या नावे १० सर्वे नंबर आहेत. त्यापैकी सर्व्हे नं. १०/८, १०१/१७ आणि ११/५ या ३ सर्व्हे नंबरमध्ये प्रत्यक्ष एकही आंबा किंवा काजूचे झाड नसताना स्थानिक तलाठी व कृषी अधिकाऱ्यांनी संगनमत करून नुकसान भरपाईचे अर्ज मंजूर केले व ते पात्र ठरवले आहेत. अशा प्रकारे एकही झाड नसताना बोगस नोंदी करून शासकीय निधी लाटणे हा थेट भ्रष्टाचार आहे.
​माडखोल गावात २५० ते ३०० अर्जांपैकी सुमारे १०० अर्ज अशाच प्रकारचे बोगस असण्याची दाट शक्यता राणे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व संबंधित सर्व्हे नंबरची, प्रत्यक्ष लागवडीची आणि झाडांची मोजमापे करून प्रत्यक्ष स्पॉट पंचनामा करण्यात यावा. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
​आपल्या अर्जाची दखल घेऊन न्याय न मिळाल्यास वयाची ७६ वर्षे आणि दिव्यांगत्व असतानाही ३ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण बसण्याचा इशारा भगवान राणे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर, पोलीस अधीक्षक, जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

शेअर करा