सावंतवाडी,दि.०५ ऑगस्ट
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त धाकोरे येथील वसवाचे तळे अंगणवाडीत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून गरोदर व स्तनदा मातांना स्तनपानाचे महत्त्व, माता व बाळाच्या आरोग्यासाठी होणारे फायदे तसेच योग्य स्तनपान पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका देविका गोवेकर व मदतनीस पूजा कोठावळे यांनी केले. यावेळी आशा सेविका श्रुती सातार्डेकर यांनी उपस्थित स्तनदा व गरोदर महिलांना स्तनपानाचे महत्त्व आणि त्यासंबंधी आवश्यक माहिती दिली तसेच अंगणवाडी सेविका देविका गोवेकर यांनी गरोदर मातांना आरोग्यदायी सवयी, पोषण आणि नवजात बालकांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सिया गावडे, रेश्मा चराटकर, अमृता गावडे, स्वाती पालव, सानिका परब, सुनंदा परब, तनुजा गोवेकर, लक्ष्मी पालव, शीतल नाईक, सुजाता कापडी, राजश्री गावडे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमामुळे स्तनपानाबाबत जनजागृती होऊन माता व बाल आरोग्याविषयी महिलांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचल्याचे अंगणवाडीच्या वतीने सांगण्यात आले.
अंगणवाडी च्या विविध उपक्रमांची दखल घेत येथील श्री काळोबा मित्रमंडळ वसवाचे तळे यांच्यावतीने अंगणवाडीला प्लास्टिक ड्रम भेट म्हणून देण्यात आला.यावेळी अंगणवाडी सेविका देविका गोवेकर व पालकांनी श्री काळोबा मित्र मंडळाचे आभार मानले.