सिंधुदुर्गातील नेत्यांच्या नाकर्तेपणावर विलास सावंत यांची टीका
सावंतवाडी,दि.२ जुलै
नवी मुंबईतील वाशी येथील सिमेंटच्या जंगलातून मोठ्या प्रयत्नांनी वेंगुर्ला येथे आणलेले महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्यालय आता चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री. विलास सावंत यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आता जागृत होण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे.
३० जून २०२६ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार, हलकर्णी एमआयडीसीतील १ लाख ४७ हजार ६२० चौरस मीटर (सुमारे ३६ एकर) भूखंड महाराष्ट्र राज्य काजू मंडळाला खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जिरायत दर ठेवून ५८ कोटी ७८ लाख ९६ हजार ९३० रुपये मोबदला मंजूर करण्यात आला आहे. या ३६ एकर जमिनीमध्ये काजू मंडळाचे चंदगड उपविभागीय कार्यालय, सेंटर ऑफ एक्सलन्स, काजूकरिता विशेष वस्तू बाजार (स्पेशल कमोडिटी मार्केट), प्रक्रिया केंद्रे व गोदामे उभारण्यात येणार आहेत.
हा ड्रीम प्रोजेक्ट हलकर्णी येथे मंजुरी मिळवून देण्यात काजू बोर्डाचे डायरेक्टर व अर्थतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी आपली सर्व ताकद लावून शासनाला जमीन देण्यास भाग पाडले. मध्यंतरी हा प्रोजेक्ट पालघर येथे जाण्याची बातमी आली होती. पालघर हे सिंधुदुर्गातून ५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असल्याने शेतकऱ्यांसाठी ते गैरसोयीचे ठरले असते. त्याऐवजी सिंधुदुर्गापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हलकर्णी येथे संपर्क साधणे शेतकऱ्यांना सुखावह ठरणार आहे. कोल्हापूर मधील आजरा, चंदगड व गडहिंग्लज या तालुक्यात काजूचे क्षेत्र वाढत असून सध्या तेथे ११ ते १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर काजू क्षेत्र असून आणि जिल्ह्याला जीआय मानांकन (GI Tag) असूनही येथील लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जिल्ह्याला ‘ठेंगा’ दाखवला गेल्याची खंत सावंत यांनी व्यक्त केली.
आमदार दीपक केसरकर आणि डॉ. परशराम पाटील यांच्या योगदानामुळे वाशी येथील मुख्यालय वेंगुर्ला येथे आले होते. मात्र, आता हलकर्णी येथे ३६ एकरचा भव्य ड्रीम प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर वेंगुर्ला येथील मुख्यालय हलकर्णीला वर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नेते केवळ बैठका आणि प्रसिद्धी पलीकडे काही करताना दिसत नाहीत, अशी टीका सावंत यांनी केली. एक काजू बोर्ड डायरेक्टर एवढी मोठी किमया करू शकतो, मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राजकारणातच मशगूल आहेत. या परिस्थितीवर जिल्ह्यातील सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन श्री. विलास सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.