सरपंच प्रचिती कुबल यांची डेपोला धडक; प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन
सावंतवाडी, दि. २२ मे
नगरपरिषदेच्या कचरा डेपोतील आगीच्या धुरामुळे गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून चराठा ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. चराठे सरपंच प्रचिती कुबल यांनी आज शिष्टमंडळासह डेपोला धडक दिली. यावेळी प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर व आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी उपस्थित राहत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. न.प. प्रशासनाकडून याची दखल घेत कार्यवाही करण्यात येईल, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार नाही, अशी माहिती श्री. आडीवरेकर यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून कचरा डेपो येथे आग लागल्याचे पहायला मिळत आहे. ही आग विझवण्यात देखील आली होती. मात्र, चार दिवस परिसरात पसरणारे धुराचे लोट बघता ही आग जाणूनबुजून लावली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यानंतर चराठे सरपंच सौ. कुबल यांनी कचरा डेपोला धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी घटनास्थळी जात त्यांच्याशी चर्चा केली. आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्याकडून झालेल्या त्रासासाठी ग्रामस्थांची दिलगीरी व्यक्त करत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य ॲन्थोनी डिसोजा म्हणाले, २०२५ मध्ये यासाठी उपोषणाचा इशारा आम्ही दिला होता. त्यावेळी आग लावणार नाही, ग्रामस्थांना त्रास होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र, या आठ दिवसांत आग लावण्यात आली असून येथील कर्मचारीच ती लावत आहे. जाणूनबुजून हा प्रकार होत आहे. याबाबत मुख्याधिकारी व आरोग्य सभापती यांना ही परिस्थिती आम्ही दाखवून दिली. त्यांनी कार्यवाहीच आश्वासन दिले आहे. मात्र, या कचऱ्यासह धुरामुळे लहान मुलं, ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागत आहे अशी भावना व्यक्त केली. तर बरीच वर्ष इथे कचऱ्याची समस्या आहे. लोकांच्या घरी वर्गीकरण करूनही इथे टाकला जाणारा कचरा एकत्रच टाकला जातो. ही आग लावली जात असून गेले ७ दिवस इथल्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बऱ्याचदा न.प. प्रशासनाला सांगितले आहे. आज संयमाचा अंत झाला. मुख्याधिकारी यांनी भेट देत १० दिवसांत यावर कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे. त्यांनी तो पूर्ण करावा अशी मागणी सरपंच सौ. कुबल यांनी केली.
दरम्यान, ग्रामस्थांना त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ, इथे लागलेली आग विझवण्यात आली होती. मात्र, वाऱ्यामुळे ती पुन्हा पेटल्याचे निदर्शनास येते. तसेच काहीजण इथे कचरा टाकत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह दोन्ही बाजूला दरवाजे बसवून परिसर बंदिस्त केला जाईल. ग्रामस्थांना झालेल्या त्रासासाठी दिलगीरी व्यक्त करत असून हा कचरा येथून उचलण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचाही त्यावर लक्ष आहे. मुख्याधिकारी यांनी स्वतः याठिकाणी भेट दिली असून लवकरच यावर तोडगा काढू, अशी माहिती आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली. यावेळी चराठा सरपंच प्रचिती कुबल, ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य ॲन्थोनी डिसोजा,डुमिंग डिसोजा, परशुराम पाटील, सुरेश गावडे, आकाश गावडे, लतालीन डिसोजा, महेश नाईक, कुणाल गावडे, न.प.चे
प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे,
आरोग्य निरीक्षक विनोद सावंत आदी उपस्थित होते.