सावंतवाडी : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

शेअर करा

सावंतवाडी मध्ये ३१ जुलै रोजी भव्य महसूल समाधान शिबिर

सावंतवाडी दि.३० जुलै
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, महसूल विभागाशी संबंधित सेवा, विविध प्रमाणपत्रे, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा तसेच आरोग्य सुविधांचा लाभ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम शासनाने हाती घेतला आहे.

या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृह, नगरपरिषद सावंतवाडी येथे भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरास जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, अध्यक्षस्थान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर भूषविणार आहेत.

या शिबिरामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषदेचे आमदार सर्वश्री प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे,अनिकेत तटकरे, ॲड. निरंजन डावखरे, प्रसाद लाड, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या विशेष शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, दाखले, शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, मार्गदर्शन, आरोग्य तपासणी तसेच विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवक, विद्यार्थी तसेच गरजू लाभार्थ्यांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

तरी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवक तसेच पात्र लाभार्थ्यांनी ३१ जुलै रोजी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानात’ मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.

शेअर करा