सावंतवाडी रोड स्थानकावरील एक्सप्रेस थांब्यांसाठी नागरिक आक्रमक; पीजी पोर्टलवर तक्रारींचा वर्षाव

शेअर करा

रेल्वे मंत्रालयाची मंजुरी असूनही अंमलबजावणीत विलंब; गणेशोत्सवापूर्वी तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी नागरिकांची केंद्र सरकारकडे मागणी.

सावंतवाडी, दि- २४ जुलै
रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देऊनही सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास कोकण रेल्वेकडून होत असलेल्या विलंबाविरोधात जागरुक नागरिक आक्रमक झाले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचे हाल टाळण्यासाठी रेल्वेने या थांब्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी नागरिकांनी थेट केंद्र सरकारच्या पीजी पोर्टलवर तक्रारी नोंदविण्यास सुरुवात केली आहे.


विनोद नाईक राणे आणि संतोष पास्ते यांनी १८ जुलैला रेल्वे मंत्रालयाकडे रेल्वे बोर्ड पीजी पोर्टलद्वारे एक जाहीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै रोजी अधिकृत पत्र जारी करून सावंतवाडी रोड स्थानकावर तीन गाड्यांना थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये १२१३३/३४ मुंबई सीएसएमटी मंगळूरु जंक्शन एक्स, १२४३१/३२ तिरुवनंतपुरम हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स, १२०१/०२ लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली गरीबरथ एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. मात्र, रेल्वे बोर्डाचे आदेश येऊनही कोकण रेल्वेकडून अद्याप या थांब्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात आलेले नाही. तसेच रेल्वे बुकिंग सिस्टीममध्येही हा थांबा अपडेट करण्यात आलेला नाही. गणपती सण तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे तिकीट बुकिंग व प्रवासाचे नियोजन करताना प्रचंड हाल होत आहेत. या विषयावर दाखल तक्रार सध्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक गणेश सामंत यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

शेअर करा