सावंतवाडी : वारंवार वीज खंडितीमुळे नागरिक हैराण; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मनसेची मागणी

शेअर करा

‘पावसाळ्यापूर्वीच अशी अवस्था, तर भर पावसात काय होणार?’; जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकरांचा वीज वितरण खात्यावर निशाणा

सावंतवाडी,दि.२९ मे 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी पेक्षा यावर्षी उष्मा वाढलेला असून सुर्य आग ओकत असताना वीजवितरण खात्याचे अधिकारी सुशेगात असल्याप्रमाणे वागत आहेत. दिवस रात्र कोणतही कारण नसताना वारंवार विज खंडित होत असून यामुळे नागरिक, व्यापारी, उद्योजक यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. पावसाला अजून सुरूवात झालेली नाही त्यामुळे आतापासून जर हि अवस्था आहे तर भर पावसात जनतेला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे याची कल्पना केलेली बरी असे मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी म्हटले आहे.
नुकतीच पालकमंत्री नितेश राणे यांनी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत अधिकारी वर्गाला जबाबदार धरून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र वीजवितरण खात्याच्या अधिकारी वर्गाने या आदेशाला केराची टोपली दाखवली असून दिवसभरात दहा ते पंधरा वेळा कोणतेही नैसर्गिक कारण नसताना वारंवार विज खंडित होत आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी आता याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी किंव्हा दिवसभर सतत व विनाकारण खंडित होणाऱ्या वीजेच्या समस्येवर तरी ठोस उपाययोजना करावी असे आवाहन मनसे तर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केले आहे.

शेअर करा