सावंतवाडी,दि.१८ सप्टेंबर
सावंतवाडी नगरपालिकेच्या इमारतीवर असलेले संस्थानकालीन आणि ब्रिटिशकालीन ऐतिहासिक घड्याळ तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी पुन्हा एकदा पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. देखभाल आणि दुरुस्तीअभावी बंद पडलेले हे घड्याळ सुरू झाल्याने सावंतवाडीकरांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
या घड्याळाची दुरुस्ती नाशिक येथील गणेश वॉच कंपनीकडून करण्यात आली असून, यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. घड्याळात सातत्याने तांत्रिक अडचणी येत असल्याने मध्यंतरी त्याच्या जागी डिजिटल घड्याळ बसवण्याचा विचारही प्रशासनाकडून सुरू होता. मात्र, ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने जुनेच घड्याळ दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुरुस्ती करणाऱ्या कंपनीने या घड्याळासाठी आठ वर्षांची गॅरंटी दिली आहे.
शहरभरातून दृश्यमानता: सावंतवाडी शहराच्या चारही बाजूंनी हे घड्याळ स्पष्टपणे दिसते.नियमित भोंगा वाजवला जातो दररोज पहाटे ६, दुपारी १२ आणि रात्री ९ वाजता या घड्याळातून विशेष भोंगा वाजवला जातो. डिजिटल युगातही शहरातील अनेक नागरिक, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक वेळेचा अंदाज घेण्यासाठी याच घड्याळाच्या ठोक्यांवर व भोंग्यावर अवलंबून असतात.
हे ऐतिहासिक घड्याळ पुन्हा सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय तर दूर झाली आहेच, शिवाय सावंतवाडीच्या वैभवात आणि पर्यटनातही यामुळे मोलाची भर पडणार आहे.