सावंतवाडी : राज्यात भेसळखोरांवर धडक कारवाई; सिंधुदुर्ग मात्र अजूनही कारवाईच्या प्रतीक्षेत

शेअर करा

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेची राज्यभर चर्चा; सिंधुदुर्गातील अन्न सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

सावंतवाडी दि. ३० जून

गेल्या दोन-तीन आठवड्यांत महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, मावा-मिठाई, गुटखा, तंबाखूयुक्त पानमसाला तसेच एमडीएमए सारख्या अंमली पदार्थांवर जागोजागी मोठी कारवाई झालेली पाहायला मिळाली. अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यतत्परतेमुळे या कारवाया शक्य झाल्या असून, संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे. मात्र, राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी कोणतीही मोठी कारवाई न झाल्याने जिल्ह्यातील अन्न सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,

अशी स्पष्ट भूमिका अन्न सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी मांडली आहे.
​डॉ. परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दररोज हजारो लीटर दूध येत असते. तसेच जिल्ह्यात जागोजागी मिठाईची दुकाने आहेत. असे असतानाही जिल्ह्यात दूध, भेसळयुक्त मावा किंवा पनीर यावर कुठेही मोठी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. याचा अर्थ जिल्ह्यात सगळं आलबेल आहे असा घ्यायचा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कुडाळ, मालवण, वैभववाडी अशा काही ठिकाणी गुटख्यावर कारवाई झाली असली, तरी ज्या प्रमाणात त्याची विक्री होते, त्या मानाने ही कारवाई अत्यंत तोकडी आहे.


​सर्वात गंभीर बाब म्हणजे, जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज परिसरात एमडीएमए (MDMA) सारखे महाभयंकर सिंथेटिक अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असून, यामुळे अख्खी तरुण पिढी बरबाद होत आहे. असे असतानाही जिल्ह्यात कुठेही एमडीएमएचे साठे जप्त झाल्याचे किंवा मुख्य विक्रेते पकडले गेल्याचे दिसलेले नाही.


​या निष्क्रीयतेच्या मुळाशी अन्न आणि औषध जिल्हा प्रशासनातील रिक्त पदे कारणीभूत असल्याचे डॉ. परुळेकर यांनी निदर्शनास आणून दिले. अन्न सुरक्षा जिल्हा प्रशासनाकडे सध्या कर्मचारी आणि ड्रायव्हरची अनेक पदे रिक्त आहेत, एवढेच नव्हे तर विभागाकडे स्वतःची गाडी आणि चालकही उपलब्ध नाही.


​त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, पकडलेल्या भेसळयुक्त अन्नाची तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच काय, तर संपूर्ण कोकण विभागात एकही अधिकृत तपासणी प्रयोगशाळा (लॅब) नाही. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ तीनच तपासणी लॅब आहेत. त्यामुळे जप्त केलेल्या अन्नाचे नमुने तिथे पाठवल्यानंतर त्याचा अहवाल यायला कित्येक महिने लागतात. या दिरंगाईचा फायदा घेऊन अनेकदा रिपोर्ट्स ‘भेसळ नसल्याचे’ येतात आणि आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटतात.


​जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र अन्न तपासणी प्रयोगशाळा निर्माण केली जात नाही, तोपर्यंत तुकाराम मुंढे यांच्यासारखे कितीही कर्तव्यतत्पर आणि कडक आयुक्त आले, तरी भेसळ करणारे आणि अंमली पदार्थांचे तस्कर कधीही गजाआड जाणार नाहीत, असे स्पष्ट मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.

शेअर करा