सावंतवाडी,दि.९ ऑगस्ट
देशभरात ‘घर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून उद्या, सोमवारी सावंतवाडी शहरात भव्य ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली असून, या यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या सावंतवाडीतील तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना विशेष निमंत्रण दिले आहे. यासंदर्भात बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, देशाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे. सावंतवाडी आणि परिसरातील सर्व नागरिकांनी, युवकांनी आणि विविध क्षेत्रांतील बांधवांनी कोणतीही कसूर न ठेवता या राष्ट्रभक्तीच्या उपक्रमात सहभागी होऊन तिरंगा यात्रा यशस्वी करावी.
उद्या होणाऱ्या या तिरंगा यात्रेमुळे सावंतवाडी शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण होणार असून, नागरिकांनी आपले राष्ट्रप्रेम जागृत ठेवून या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असा पुनरुच्चारही त्यांनी याप्रसंगी केला.