सावंतवाडी : पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

शेअर करा

सिंधुदुर्गात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामावर संकट; हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करण्याचे आवाहन

​सावंतवाडी,दि.१७ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे बळीराजा चिंतेत सापडला असून, खरीप हंगामातील शेतीकामांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी महाविद्यालय, मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जून ते २१ जून २०२६ या कालावधीसाठी मध्यम मुदतीचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरण्या न करता हवामानाचा अंदाज घेऊनच पुढील पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
​हवामानाचा अंदाज आणि पिवळा इशारा:
​कृषी हवामान केंद्रानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत काही ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाच्या (५ ते १० मि.मी.) पावसाची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. हवेतील आर्द्रता वाढण्याची शक्यता असून हवामान प्रामुख्याने ढगाळ राहील. तसेच ताशी ७ ते ९ किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

​शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे महत्त्वाचे सल्ले:
​उष्ण व दमट हवामानामुळे भात रोपवाटिकेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने कृषी तज्ज्ञांनी उपाययोजना सुचवल्या आहेत.
​भात शेती व्यवस्थापन: ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, तिथे भात रोपवाटिकेचे संरक्षणात्मक सिंचन करावे. रोपवाटिकेतील मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मोकळ्या जागेमध्ये धान्य किंवा भुशाच्या पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. तसेच रोपवाटिकेतील तण नियंत्रणावर विशेष भर द्यावा.
​पेरणीबाबत खबरदारी: नागली, भुईमूग, हळद इत्यादी पिकांच्या पेरणीची किंवा लागवडीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. जमिनीत पुरेसा ओलावा आणि चांगला पाऊस झाल्यानंतरच या पिकांची कामे हाती घ्यावीत. आंबा, काजू, नारळ, सुपारी यांसारख्या नवीन बागायती पिकांची लागवड करताना पावसाचा अंदाज घ्यावा. नवीन रोपांना काठीचा भक्कम आधार देऊन योग्य ती काळजी घ्यावी. पेरणीची अजिबात घाई करू नये. चांगल्या पावसाची खात्री झाल्यावरच वाफे तयार करताना शेणखत वापरून पेरणी करावी. भुईमुगासाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
​ लागवडीची घाई न करता चांगल्या पावसानंतरच लागवड करावी.
​आंबा व काजू (नवीन लागवड): लागवड पावसाचा अंदाज घेऊनच करावी आणि कलमांना काठीचा आधार द्यावा. काजू कलमाच्या पिशवीतून काढताना काळजी घ्यावी, तसेच जोडाखालील येणारे फुटवे काढून टाकावेत.
​नारळ व सुपारी: नारळाची रोपे जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा ३० ते ४५ सेमी खोल लावावीत आणि वाऱ्याने हलणार नाहीत यासाठी काठीचा आधार द्यावा. सुपारीची लागवड ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करावी आणि लागवडीनंतर पाणी, खुरपणी व संरक्षणाकडे लक्ष द्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
​पशुधन संवर्धन: जनावरांना पिण्यासाठी ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. गोठ्याची नियमित स्वच्छता ठेवावी आणि तिथे पुरेशा निवाऱ्याची व योग्य हवेची सोय असावी.
​कुक्कुटपालन: शेडमधील पाण्याची भांडी वाढवावीत. पक्षांना स्वच्छ, थंड पाणी आणि खाद्य मुख्यत्वे सकाळी किंवा संध्याकाळच्या थंड वेळेतच द्यावे, असे ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी महाविद्यालय, मुळदे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी सांगितले आहे.

शेअर करा