बॅ. नाथ पै सभागृहात जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा रंगतदार आविष्कार**
सावंतवाडी,दि.२२ मे
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘असंघटित लोककलांचा महोत्सव’ शुक्रवारी सावंतवाडीत मोठ्या दिमाखात सुरू झाला. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते द्धिपप्रज्वलीत करून येथील बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून २२, २३ आणि २४ मे या तीन दिवसांच्या कालावधीत या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्याला नाट्य दिग्दर्शक व अभिनेते गणेश ठाकूर, अभिनेत्री डॉ सोनल लेले, मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर आणि आर्यन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
’डिजिटल युगात प्रेक्षक घटणे चिंताजनक’ – गणेश ठाकूर
यावेळी मनोगत व्यक्त करताना अभिनेते गणेश ठाकूर यांनी आजच्या डिजिटल युगातील परिस्थितीवर खंत व्यक्त केली. ते म्हणाले,
”आजच्या डिजिटल युगात प्रेक्षक चांगल्या दर्जेदार कार्यक्रमांकडे पाठ फिरवत आहेत, ही चिंतेची बाब आहे. हा ‘असंघटित लोककलांचा महोत्सव’ म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी एक पर्वणी असून, महाराष्ट्रातून लुप्त होत चाललेल्या दुर्मिळ लोककला जवळून पाहण्याची ही एक उत्तम संधी आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.”
या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ लोककला प्रकार सादर केले जात आहेत:
शुक्रवार (पहिला दिवस): करपल्लवी गोंधळी, बहुरूपी, धनगरी ओवी, हेळवी लोककलावंत, फुगडी आणि झिम्मा या पारंपरिक कलाप्रकारांनी महोत्सवाची दणक्यात सुरुवात झाली.
शनिवार (दुसरा दिवस): आदिवासी पाटा गायन, खेळे कळसूत्री बाहुल्यांचा प्रयोग, धिरो धिरो नृत्य, मयूर नृत्य आणि लैंगी बंजारा नृत्य सादरीकरण होणार आहे.
रविवार (तिसरा दिवस): कोकणची समृद्ध लोककला परंपरा असलेले दशावतार नाटक, कोळी नृत्य, सोंगी मुखवटे, दिमडी, ढोलकी, ढोल-ताशा वाद्यवृंद जुगलबंदी आणि भारुड अशा प्रसिद्ध कलाप्रकारांची मेजवानी असेल.
महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा अनुभवण्यासाठी सावंतवाडी व परिसरातील रसिक प्रेक्षकांनी, नागरिकांनी आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.