​सावंतवाडी आमसभेत मूलभूत प्रश्नांचा भडिमार; आजगाव मायनिंगला विरोध

शेअर करा

स्थानिक प्रश्नांवर आमदार दीपक केसरकर आक्रमक

सावंतवाडी (प्रतिनिधी):


आजगाव परिसरातील नियोजित मायनिंग सर्वेक्षणाला जनतेने विरोध केला आहे. लोकांना मायनिंग नको आहे,मी जनतेसोबत सोबत आहे असे आमदार दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले.
रस्ते, पाणी, वीज, रोजगार, बीएसएनएल नेटवर्क, आरोग्य आणि झेन झी (Gen Z) च्या प्रश्नांवरून सावंतवाडी तालुक्याची आमसभा चांगलीच गाजली. तब्बल नऊ वर्षांनंतर येथील नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. तालुक्यातील विविध प्रलंबित विषयांवर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले.
​मायनिंग प्रकल्पाला विरोध आणि टर्मिनस सुविधा:
​आजगावसह काही गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला. यावर बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी, “मायनिंग प्रकल्पाला तुमचा स्पष्ट विरोध आहे तर मी स्थानिक लोकांसोबत आहे. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता याविरोधात ठराव करून तो शासनाकडे पाठवला जाईल,” असे स्पष्ट केले. तसेच, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी आवश्यक ती सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
​रस्ते व पूल: सांगेली घोलेवाडी पूलाची उंची वाढवणे किंवा नवीन पूल उभारण्याचा विषय पुढील वर्षाच्या बजेटमध्ये घेतला जाईल. शिरशिंगे-गोठवेवाडी २५ कोटींच्या रस्त्याचे काम वनविभागाच्या परवानगीमुळे अडले असून त्याबाबत पाठपुरावा केला जाईल. बांदा-पात्रादेवी रस्ता व शहरातील खड्ड्यांचे डांबरीकरण पावसानंतर केले जाईल.
​पाणी व वीज प्रश्न: सावरवाड, सनाम टेंब व घोलेवाडी नळयोजनेसाठी ‘निरंतर वीज योजने’ अंतर्गत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले जातील. सातार्डा पाणी योजनेसाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. कोलगाव नळयोजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
​रोजगार व एमआयडीसी: तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आमसभेत उपस्थित करण्यात आला. यावर उत्तम स्टीलच्या पडीक जागेत एमआयडीसी आणण्यासाठी उद्योगमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन आमदारांनी दिले.
​आरोग्य सेवा: सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) पोस्ट मार्टमसाठी एमबीबीएस डॉक्टर मंजूर झाले असून ते लवकरच हजर होतील, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिली.
​या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष अनिल नीरवडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह विविध पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​सभेत एकाच वेळी अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने आणि प्रश्न विचारण्यासाठी नागरिकांची घाईगडबड उडाल्याने काही काळ वातावरणात गोंधळ निर्माण झाला होता; मात्र अध्यक्ष केसरकर व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांची दखल घेत सकारात्मक आश्वासने दिली.

शेअर करा