वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष ‘कृषी पंडित’ शिवाजीराव कुबल यांच्या निधनाने मोठी हानी: माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले

शेअर करा

सावंतवाडी दि.२४ जुलै
वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि ‘कृषी पंडित’ शिवाजीराव कुबल यांच्या निधनाबद्दल माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
​आपल्या शोकसंदेशात प्रवीण भोसले यांनी म्हटले आहे की, “सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते, वेंगुर्ले नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि माझे जवळचे सहकारी शिवाजीराव कुबल यांच्या निधनाचे वृत्त समजून अत्यंत दुःख झाले. कृषी व फलोत्पादन क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘कृषी पंडित’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले होते.”
​सध्या वैयक्तिक कारणास्तव मुलीकडे अमेरिकेत असल्याने प्रत्यक्ष अंत्यसंस्कारास उपस्थित राहता येत नसल्याची खंत व्यक्त करत भोसले यांनी कुबल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच, दिवंगत शिवाजीराव कुबल यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना त्यांनी श्री देव पाटेकर चरणी केली.

शेअर करा