सावंतवाडी,दि.३१ जुलै
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे नं. १ या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार, उपाध्यक्ष रवींद्र मुळीक ,पोलीस पाटील श्रीराम प्रभुराळकर ,अंगणवाडी ताई श्रीम. साटेलकर उपस्थित होत्या.
प्रथम सरस्वती मातेला वंदन करून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर यांनी आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च आहे तसेच गुरुकुल पद्धती बद्दल माहिती दिली . प्रथम गुरू आई चे पाद्यपूजन व औक्षण करून आईचे आशीर्वाद घेण्याबाबत यावेळी आवाहन करण्यात आले .
सर्व मुलांनी आपल्या आईचे पाद्यपूजन करून औक्षण करून गोड पदार्थ भरून आशीर्वाद घेतले .यावेळी काही महिला भगिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. यावेळी शाळेतील वातावरण भक्तीभाव आणि कृतज्ञतेने भरलेले होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व पालकांसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार यांनी गोड खाऊ वाटप केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहकारी शिक्षक सोनल जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सहावी व सातवीच्या विद्यार्थिनी दूर्वा मुळीक , देवयानी मुळीक व रुंजी नाईक यांनी खूप मेहनत घेतली. यावेळी सहकारी शिक्षक अर्जुन रणशूर व स्वयंसेविका दिव्या काकतकर यांचेही सहकार्य लाभले.
बऱ्याच पालकांनी हा आगळावेगळा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नियोजित केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर तसेच सहकारी शिक्षक सोनल जाधव यांचे आभार मानले.