सावंतवाडी ,दि.३१ मे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मौल्यवान मातीला मोठा भाव आला असून ठिकठिकाणी अवैध मायनिंगचे पेव फुटल्याचे चित्र दिसत आहे. आडाळी एमआयडीसी येथे रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या मायनिंगची चर्चा सुरू असतानाच, आता झाराप रेल्वे स्थानकावर खनिज सदृश्य मातीचे प्रचंड ढीग येऊन पडत असल्याने खळबळ उडाली आहे. ही माती नेमकी कुठून येत आहे आणि कुठे जात आहे, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
डॉ. परुळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अवघ्या आठवड्याभरात पाच मालगाड्या (रेल्वे ट्रेन) भरून ही खनिज सदृश्य माती वास्को (गोवा) येथे नेण्यात आली आहे. सध्या सहावी ट्रेन अत्यंत जलदगतीने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रेल्वे स्थानकावर दिवसाला शेकडो डंपर्स भरून ही माती आणली जात आहे. मात्र, ही माती नक्की कुठून येत आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती समोर येत नाहीये.
मळेवाड, कोंडुरा की धाकोरा या भागांतून ही खनिजमाती एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेर पाठवली जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असून, हे सर्व गौडबंगाल अनाकलनीय आहे. हा प्रकार निश्चितपणे अवैध मायनिंगचा असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालावे आणि या अवैध वाहतुकीची व मायनिंगची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता झाराप ग्रामस्थांकडून केली जात असल्याचे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.