सावंतवाडी, दि. ६ जुलै
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरांवर झाडे कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पहिली घटना ओटवणे येथे घडली. ओटवणे येथील लवू तावडे यांच्या राहत्या घरावर आंब्याचे मोठे झाड कोसळले. यामध्ये त्यांच्या घराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ओटवणे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा आढावा घेतला.
दुसऱ्या घटनेत, ओटवणे परिसरातीलच दांडेली येथील श्री. बाळा मोरजकर यांच्या राहत्या घराच्या पडवीवर अचानक झाड कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या घराच्या पडवीचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच तिसरी घटना नेमळे येथे घडली असून, नेमळे-सिद्धार्थनगर येथील रहिवासी राजश्री काशीराम नेमळेकर यांच्या घरावार नारळाचे झाड कोसळले. या झाडपटीत नेमळेकर यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे.
या तिन्ही घटनांमध्ये संबंधित कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महसूल प्रशासनाने तातडीने या तिन्ही ठिकाणचे पंचनामे करून बाधितांना योग्य ती शासकीय मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.

