सावंतवाडी : प्राण्यांना बुद्धी असती तर कदाचित मानव जात अस्तित्वात आलीच नसती. श्री.रमेश गांवस

शेअर करा

सावंतवाडी दि.२८ मे
या पृथ्वीवर मानव निर्माण होण्याआधी सुमारे ६० कोटी वर्षे प्राणी अस्तित्वात आले आहेत.उत्क्रांतीच्या या टप्प्यात जर मानवा प्रमाणे जर प्राण्यांना बुद्धी प्राप्त झाली असती तर कदाचित या पृथ्वीवर माणूस अस्तित्वातच आला नसता.कारण अवघ्या तीन लाख वर्षां पुर्वी अस्तित्वात आलेल्या मानवाने आपल्याला लाभलेल्या बुद्धीसामर्थ्याचा विध्वंसक वापर करून संपुर्ण पर्यावरणाची एवढी प्रचंड हानी केली आहे की येत्या अवघ्या तीस ते चाळीस या पृथ्वी वरील जीवसृष्टीचा समुळ विनाश जवळपास अटळ आहे,असे प्रतिपादन गोव्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते श्री.रमेश गांवस यांनी केले. राष्ट्र सेवा दल,सिंधुदुर्गच्या वतीने विजयदुर्ग ते दोडामार्ग अशी गेले पाच दिवस सुरू असलेल्या पर्यावरण जागृती सायकल यात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
सागर ते सह्याद्री बीज अंकुरे अंकुरे असे घोषवाक्य घेवून २३ मे पासून राष्ट्रसेवादलाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या २०० किमी. अंतराच्या पर्यावरण जागृती सायकल यात्रेचा शानदार समारोप दि.२७ रोजी दोडामार्गच्या सीमेवर असलेल्या गोवा मुक्ती सत्याग्रहाच्या स्मृती स्थळी पर्यावरण रक्षणाची शपथ घेवून व महोगनी वृक्षाच्या बीयांचे रोपण सहभागी युवकांच्या हस्ते करून करण्यात आला.या प्रसंगी सुप्रसिद्ध पत्रकार – कवि- किर्तनकार ह.भ.प.श्यामसुंदर सोन्नरमहाराज, ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परूळेकर,गोवा सेवादलाचे सुहास ठाकूर देसाई,शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर,सेवा दल सिंधुदुर्गचे अध्यक्ष ॲड.प्रविण नाईक,संघटक नितीन वाळके यांचे सह पुणे,हैद्राबाद,सिंधुदुर्ग व गोवा येथील सर्व सहभागी सायकल यात्री आणि रत्नागिरी,सिंधुदुर्ग व गोव्यातील पर्यावरण रक्षण चळवळीत कार्यरत असणाऱ्या विवध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्विकारून आपण प्रत्येकाने किमान झाडे तोडणार नाही,तोडू देणार नाही व दरवर्षी एक तरी वृक्ष लावून तो जगवेन, एक किमी पर्यंतचे छोटे अंतर पायी चालणार,पाच दहा किमी.च्या परिघातल्या येण्याजाण्यासाठी सायकल आणि फक्त मोठ्या व अत्यावश्यक अंतराच्या प्रवासासाठीच वाहनांचा वापर करणार,कचऱ्याची योग्य पद्धतीनेच विल्हेवाट लावणार,प्लास्टीकचा कमीत कमी वापर करणार आणि सिंगल युझ प्लास्टीकचा वापर टाळणार,वीजेचा अपव्यय टाळणार एवढा जरी निश्चय करून तो कसोशीने पाळला तरी मानवाने आपल्याच बुद्धीने निर्माण केलेले पृथ्वीच्या विनाशाचे हे संकट काहीसे लांबू शकेल.माणूस अन्नपाण्या वाचून काही दिवस जगू शकतो पण प्राणवायू वाचून तीन मिनिटांपेक्षा जिवंत राहू शकत नाही.आपल्याला वारसा हक्काने मिळालेली स्वच्छ हवा आणि पाणी जर आपण असेच दुषित करीत राहिलो तर आपल्या मुलांना निश्चितपणे ॲाक्सीजनचे सिलेंडर नाकाला लावूनच शाळेत जावे लागेल आणि ही वेळ काही फार दूर नाही,नव्हे जगातील दिल्ली सारख्या काही मोठ्या शहरात ती पाळी आलीच आहे.त्यामुळे माणसाने आपली हवस तात्काळ थांबवली नाही तर मानव प्राणी या पृथ्वीतलावरू नष्ट होईल असा स्पष्ट इशारा त्यांनी या समारोपाच्या मनोगतात दिला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ह.भ.प.शामसुंदरमहाराज म्हणाले की, आज कोकणात आले की इथली गर्द हिरवीगार वनराई आणि निळेशार समुद्र पाहून जणू स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो.महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात फिरतांना संपुर्ण रखरखीत भकासपणा सतत जाणवतो.यंदा अकोल्यात तपमानाने आजवरचे सर्व उच्चांक मोडले.सिंधुदुर्ग,गडचिरोली,चंद्रपूर आणि थोडाफार रत्नागिरी हे जिल्हे वगळता महाराष्ट्राच्या उर्वरीत जिल्ह्यात वनक्षेत्र झपाट्याने नष्ट झाले आहे. काही जिल्ह्यात तर ते एक टक्कया पेक्षाही कमी झाले आहे. काही वर्षांपूर्वी लातूरला रेल्वेने पाणी पाठवावे लागले होते याची आठवण करून देत जर तथाकथित विकासाच्या नावा खाली होत असलेली अमानुष जंगलतोड तात्काळ थांबली नाही तर तीच परिस्थिती कोकणावरही येवू शकते. सरासरी पर्जन्यमानासाठी किमान ३३% भूभाग वनाच्छादीत असणे गरजेचे असते.त्यामुळे ७००वर्षां पुर्वी ज्ञानोबांनी सांगितलेली नगर विकासाची स्मार्ट संकल्पना ‘नगरेची रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी नानाविध’ आपण विसरलो आणि साडेतिनशे वर्षांपूर्वी संत तुकोबारायांनी दिलेला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा संदेश डावलून आपण वृक्षांची कत्तल करीत सुटलो त्याचे दुष्परीणाम आता आपण भोगत आहोत. कोकण भकास होवून त्याचा मराठवाडा करायचा नसेल तर वेळीच सावध व्हा असे निरूपण त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजवादी नेत्या श्रीम.कमलताई परूळेकर यांनी उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली.प्रास्ताविक सेवादल सिंधुदुर्गचे अध्यक्ष ॲड.प्रविण नाईक यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.संजय वेतुरकर यांनी केले.यावेळी सायकल यात्रे सहभागी झालेल्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली व सहभागी युवकांच्या हस्ते महोगनी वृक्षाच्या बियांचे रोपण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी देवरुख मातृमंदिरचे विलास कोळपे विनय पानवलकर, विजय झगडे, आत्माराम मेस्त्री,ओणीहून डॉ. महेंद्र मोहन, बबन मयेकर, गोव्यातून दयानंद मांद्रेकर, अंबरीश आवटे, बाजीराव खुले, आकाश गावस, देवेंद्र कांदोळकर आणि शिक्षक भारतीचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा