सावंतवाडी, दि. २७ मे
नदीपात्रातील गाळ काढण्याच्या शासकीय आदेशाचा गैरफायदा घेत वाळू माफियांनी नदीतील खनिजे, वाळू आणि दगड-गोटे यांचे मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू केले असल्याचा आरोप स्वराज्य दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील लातये यांनी केला आहे. सन २०२२ पासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूची लूट
मिळालेल्या माहितीनुसार, तेरेखोल नदीपात्रातील सांगेली-माडखोल, बाळकाट, ओवळीये, सरमळे आणि इन्सुली या भागांमध्ये सन २०२२ पासून गाळ काढण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या आदेशाच्या नियमावलीची सर्रास पायमल्ली केली जात आहे. गाळ काढण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात नदीतील मौल्यवान खनिजे, वाळू आणि दगड-गोटे यांचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. हे उत्खनन मातीच्या पालच्या नावाखाली आणि प्रत्यक्षात अर्धवट स्थितीत असलेल्या (पटट्यात नसलेल्या) पालच्या नावावर करून वाळू माफियांना श्रीमंत केले जात आहे, असा थेट आरोप लातये यांनी केला आहे.
या गंभीर प्रकाराबाबत स्वप्नील लातये यांनी तालुका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहिती मागितली असता, धक्कादायक बाब समोर आली आहे. या उत्खनना संदर्भात “शासन दरबारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही” असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत स्वप्नील लातये यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. जर या उत्खननाबाबत आणि गाळ काढण्याबाबत शासन दरबारी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, तर मग “वाळू वाहतूक करणाऱ्या पाल आणि बोटींना वाहतुकीचे नियमन (परवानगी) कसे काय मिळते?” असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी वाळू माफिया आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वराज्य दिव्यांग संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.