मोती तलावातील दूषित पाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतीला पूर्वसूचना द्या : संजय लाड

शेअर करा

पूर्वसूचना नसल्याने नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान; नगरपरिषदेकडे निवेदन

सावंतवाडी,दि.०१ जुन

सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावातील दूषित पाणी उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात अतिवृष्टीदरम्यान माडखोल नदीपात्रात सोडण्यापूर्वी माडखोल ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत माडखोलचे माजी सरपंच संजय लाड यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना एक लेखी निवेदन सादर करत असे पाणी सोडण्यापुर्वी ग्रामपंचायतला पुर्वकल्पना द्या अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

​निवेदनात नमूद केल्यानुसार, माडखोल नदीपात्रातील पाणी उन्हाळ्याच्या दिवसांत अत्यंत स्वच्छ असते. यामुळे परिसरातील स्थानिक महिला कपडे धुण्यासाठी या नदीचा वापर करतात. तसेच माडखोल गावामध्ये लघुपाटबंधारे धरण असल्यामुळे उन्हाळ्यातही नदीला स्वच्छ पाणी वाहत असते. स्थानिक शेतकरी वर्ग आपल्या गायी, म्हशी व बैल यांसारख्या पाळीव जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि धुण्यासाठी याच नदीवर घेऊन येतात. अशा परिस्थितीत, सावंतवाडी नगरपालिकेकडून उन्हाळ्याच्या दिवसांत मोती तलावातील दूषित पाणी अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता माडखोल नदीपात्रात सोडले जाते. या अचानक सोडलेल्या दूषित पाण्यामुळे नदी प्रदूषित होऊन नागरिक, शेतकरी आणि पाळीव जनावरांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मोती तलावाचे दूषित पाणी नदीत सोडण्यापूर्वी माडखोल ग्रामपंचायतीला पूर्वसूचना देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून हे दूषित पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित विभागाशी योग्य तो समन्वय साधता येईल.
​मान्सूनच्या कालावधीत अतिवृष्टी किंवा ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास माडखोल, फुगडीवाडी आणि ग्रामपंचायत परिसर येथील सखल भागातील व्यावसायिक, दुकानदार आणि निवासी घरांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसतो. याच काळात सावंतवाडी शहरातही मोती तलाव तुडुंब भरल्यामुळे बाजारपेठेतील दुकानांचे नुकसान टाळण्यासाठी तलावाचे दरवाजे उघडून पाणी खाली सोेडावे लागते, ही वस्तुस्थिती गावकऱ्यांना मान्य आहे. परंतु, अतिवृष्टीच्या वेळी तलावाचे पाणी माडखोल नदीपात्रात सोडण्यापूर्वी संबंधित विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने माडखोल ग्रामपंचायतीला पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. नगरपालिकेने आपल्या व्यवस्थापनाची माहिती आधीच दिली, तर स्थानिक पातळीवर नागरिकांना सतर्क करून होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी माजी सरपंच संजय लाड यांनी निवेदनात केली आहे.

शेअर करा