​​​सावंतवाडी : आरोंदा येथे मुसळधार पावसात फणसाचे झाड कोसळले

शेअर करा

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

​​​सावंतवाडी,दि.२७ जुलै

आरोंदा परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे आरोंदा कन्या शाळेच्या पाठीमागील परिसरातील एक मोठे फणसाचे झाड उन्मळून पडले. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.


कोसळलेले झाड शेजारील श्री. आरोंदेकर यांच्या घराला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीवर पडल्याने तातडीने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. घटनेची माहिती निरंजन आरोंदेकर यांनी पोलीस पाटील जितेंद्र जाधव यांना दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच वायरमन अमोल लिंगे यांना माहिती देत आवश्यक कार्यवाही सुरू केली. तसेच डॉ. सुखदेव कुंभार यांनीही संबंधित विभागाला ऑनलाइन माध्यमातून घटनेची माहिती दिली.


घटना रात्री घडल्यामुळे परिसरातील अंगणवाडी बंद होती. त्यामुळे त्या ठिकाणी मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.


आज सकाळी प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने झाड बाजूला करण्याचे काम करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील जितेंद्र जाधव,बाळा आरोंदेकर, प्रभाकर आरोंदेकर, तात्या नाईक (भटपावणी), डॉ. सुखदेव कुंभार, निरंजन आरोंदेकर आदी उपस्थित होते. तसेच प्रशासक सायली साळगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.


सतत सुरू असलेल्या पावसामुळे अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे आणि धोकादायक झाडांबाबत प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा