सावंतवाडी,दि.०३ ऑक्टोंबर
महाराष्ट्रातून यंदा नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास अत्यंत वेगाने सुरू झाला असून, वेळेआधीच निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनचे निर्गमन झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. येत्या २ ते ३ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघारी फिरण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या माघारीची रेषा (Withdrawal Line) सध्या २७.५° उत्तर / ८६.५° पूर्व अक्षांश-रेखांशावरून जात असून सुपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती, हरनई (ता. दापोली) आणि १७.५° उत्तर / ७१.८° पूर्व या ठिकाणांवरून निश्चित करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातून मान्सूनच्या निर्गमनाची सर्वसाधारण तारीख ५ ऑक्टोबर असते. मात्र, यंदा या सामान्य तारखेच्या २ दिवस आधीच निम्म्या राज्यातून मान्सूनने माघार घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनच्या एक्झिटची सामान्य तारीख १२ ऑक्टोबर मानली जाते; परंतु यंदा तब्बल ७ दिवस आधीच (पुढील ४८ ते ७२ तासांत) संपूर्ण राज्यभरातून मान्सून माघारी जाण्याचा अंदाज आहे.
कोकणातील स्थिती:
उत्तर कोकणातील सर्व जिल्ह्यांतून ३ ऑक्टोबर रोजी मान्सूनचे वेळेआधीच पूर्ण निर्गमन झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. तसेच दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागापर्यंत (दापोली) मान्सून मागे फिरला आहे.
पुढील २-३ दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकातून मान्सूनच्या उर्वरित भागातून माघारीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे, अशी माहिती मुळदे येथील ‘ग्रामीण कृषी मौसम सेवा’ केंद्राकडून देण्यात आली आहे.