सावंतवाडी,दि.२६ मे
“कोणी काहीही बोलो, आम्ही आमच्या मनाप्रमाणेच काम करणार,” अशीच भूमिका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत वारंवार वीज जाण्याच्या समस्येमुळे व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र याबाबत विचारणा केली असता वीज अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
गेल्या रविवारी पहाटे सावंतवाडी शहरासह सह्याद्री पट्ट्यात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी पावसात कलंबिस्त येथील पास्तेवाडी परिसरात राघवेंद्र तावडे यांच्या घरावर थेट विजेचा खांब कोसळला. या घटनेत मोठी दुर्घटना टळली असली तरी संबंधित कुटुंब भीतीच्या छायेखाली जगत आहे. विशेष म्हणजे या घटनेला आता चार दिवस उलटून गेले तरी महावितरण प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. खांब अजूनही घरावरच पडून असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा संपर्क करूनही केवळ “ठेकेदारांची माणसं पाठवली आहेत” असे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कोणीही घटनास्थळी पोहोचलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे जवळपास ४० घरे गेले चार दिवस अंधारात असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
यापूर्वीही सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी महावितरण कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारावर टीका केली होती. आता त्याचाच प्रत्यय सामान्य जनतेलाही येत असल्याचे बोलले जात आहे. सावंतवाडी येथील महावितरण अधिकारी श्री. राक्षे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कलंबिस्त ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव यांनी आज सकाळी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. “घरावर खांब पडून चार दिवस झाले, ४० घरे अंधारात आहेत, तरीही प्रशासन झोपेत आहे. जर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी देखील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली होती. मात्र त्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध बैठका आणि दौरे करत असले तरी प्रत्यक्षात प्रशासनावर कोणताही अंकुश राहिलेला नाही, अशी भावना आता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. वीज वितरण, महसूल, शिक्षण अशा अनेक शासकीय विभागांमध्ये ढिसाळ कारभार सुरू असून सामान्य जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.