सावंतवाडी,दि.१५ ऑगस्ट
सावंतवाडी नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी स्व. धोंडू बरागडे यांचे ११ ऑगस्ट रोजी आकस्मिक निधन झाले होते. नगरपरिषद प्रशासनाने या घटनेची तत्काळ दखल घेत अवघ्या तीन दिवसांत कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीपत्र व सर्व शासकीय लाभ प्रदान केले आहेत.
लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार स्व. धोंडू बरागडे यांचे वारस यश धोंडू बरागडे यांना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मयत कर्मचाऱ्याच्या वारसाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून केवळ ३ दिवसांच्या विक्रमी कालावधीत नियुक्ती देणे, कुटुंब निवृत्ती वेतन तसेच इतर शासकीय लाभ प्रदान करण्याची ही संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे.
ही कामगिरी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल प्रसाद बटावाल आणि आस्थापना विभागातील विजय बांदेकर यांनी पूर्ण केली. या प्रक्रियेसाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष सौ. श्रद्धा लखम सावंत भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सर्व विषय समिती सभापती व सर्व नगरसेवकांचे मार्गदर्शन लाभले, असे नगरपरिषद प्रशासनाने म्हटले आहे.