सावंतवाडी,दि.१७ सप्टेंबर
मुरकरवाडी येथील पाच कुटुंबांचा ‘मुरकरांचा राजा’ गणराया आपल्या आगळ्या-वेगळ्या परंपरेमुळे भाविकांचे आकर्षण ठरत आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही जपली जात असून, गणेशोत्सवाच्या काळात या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
गणेशोत्सव सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असून गावागावांत तसेच वाडी-वस्त्यांमध्ये घरगुती गणरायाची थाटात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यामध्ये मळेवाड-मुरकरवाडी येथील ‘मुरकरांचा राजा’ने पूर्वांपार चालत आलेल्या परंपरेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
या गणरायाच्या मुकुटाची पद्धत विशेष आकर्षण ठरली आहे. पूर्वांपार चालत आलेल्या पद्धतीने गणरायासाठी खास हस्तकलेचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून ‘पाकळ्यांचा मुकुट’ तयार केला जातो. लाल रंगाची गणेशमूर्ती, पिवळा पितांबर आणि आकर्षक सजावट यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती पूर्णपणे चिकणमातीपासून तयार करण्यात आली आहे.
गणरायाच्या सभोवतालची बांबू पासून बनवलेली आकर्षक आरास तसेच सजावटीसाठी वापरण्यात आलेल “वारली पेंटिंग “भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा वारसा जपत पाच कुटुंबांकडून ‘मुरकरांचा राजा’ची भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जात आहे. या आगळ्या परंपरेतील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सध्या परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने मुरकरवाडीत येत आहेत.कित्येक वर्षांची ही परंपरा मुरकर कुटुंबीयांनी अजूनही जपून ठेवली आहे.